
मालेगाव, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर: शासकीय कामात अडथळा आणण्याचे आरोपावरून मालेगावातील माजी नगरसेवक प्रा. रिजवान खान यांच्यासह चौघांना मालेगावातील न्यायालयाने सहा महिने कारावास व प्रत्येकी 11000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मालेगाव येथील अप्पर सत्र न्यायालयाने न्या.एस.एस कंठाळे यांनी हा निकाल दिला.
महापालिका कार्यालयात आठ वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता. मनपाचे तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता जहिर अहमद अन्सारी हे आपल्या कार्यालयात बसले असताना एक बिल काढण्याच्या कारणावरून प्रा.खान त्यांनी आपल्या तिघां साथीदारांच्या मदतीने अन्सारी यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या टेबलावर असलेली फाईल चोरून नेली.
या संदर्भात अन्सारी यांनी मनपा आयुक्त यांच्या परवानगीने किल्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रा.खान यांच्यासह चौघां विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी पूर्ण करून सदर खटला मालेगावातील न्यायालयात सुनावणीसाठी सादर केला होता. या खटल्याची सुनावणी न्या. कंठाळे यांच्यासमोर झाली. या सुनावणी दरम्यान प्रा. खान यांच्यावरील आरोप खरे ठरल्याने त्यांना व त्यांच्या साथीदारांना सहा महिन्याचा कारावास व प्रत्येकी 11000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. यातील दहा हजार रुपये अन्सारी यांना देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.