
सातारा जिल्हा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांढरदेव येथे श्री काळूबाईच्या यात्रेची ‘जय्यत तयारी’ झाल्याचा गाजावाजा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती अत्यंत भयानक आणि संतापजनक आहे. एकीकडे कोट्यवधींच्या निधीच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र भक्तीच्या या पवित्र ठिकाणी कचरा, भ्रष्टाचार आणि अघोरी कृत्यांचे ‘साम्राज्य’ पाहायला मिळत आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि वाई प्रशासनाचे या दुरवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
तीर्थक्षेत्राचा विकास म्हणजे काय? तर कचऱ्याचे ढीग, अघोरी कृत्यांचा सुळसुळाट आणि भाविकांची होणारी आर्थिक लूट! वाई तालुक्यातील मांढरदेव येथे श्री काळूबाईच्या यात्रेच्या नावाखाली प्रशासकीय अनास्थेचा जो ‘नंगानाच’ सुरू आहे, तो पाहून कोणत्याही सुज्ञ नागरिकाचे डोके संतापाने भडकल्याशिवाय राहणार नाही. देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाने या पवित्र तीर्थक्षेत्राचे नरकवासात रूपांतर केले आहे.
एकीकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे आई काळूबाईच्या चरणी येणाऱ्या भाविकांना आजही अघोरी प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. मंदिर परिसरातील झाडांना काळ्या बाहुल्या, काळे बिबवे आणि जिवंत माणसांच्या फोटोंना खिळे ठोकून जे काळजाचा थरकाप उडवणारे प्रकार सुरू आहेत, ते रोखण्याचे धाडस प्रशासन का दाखवत नाही? की या अघोरी प्रथांना प्रशासनाचे छुपे समर्थन आहे? असा जळजळीत सवाल उपस्थित होत आहे.
ज्या आई काळूबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात, त्याच देवीचे फोटो आज कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अस्ताव्यस्त पडलेले आहेत. कचरा संकलनात देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत सपशेल अपयशी ठरली आहे. सगळीकडे घाणीचे साम्राज्य असून, दुर्गंधीने श्वास घेणे कठीण झाले आहे. भाविकांसाठी शौचालयांची सोय नाही, त्यामुळे उघड्यावर पसरलेल्या घाणीने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. भक्तीच्या नावाखाली भाविकांना घाणीत लोळवण्याचे पाप हे प्रशासन करत आहे.
एसटी महामंडळाने यात्रेसाठी ‘भंगार’ बसेसचा ताफा धाडला आहे. घाटात बसेस बंद पडल्याने भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. नव्या बसेस गायब कुठे झाल्या? की भाविकांच्या जिवापेक्षा महामंडळाला केवळ वसुली महत्त्वाची वाटते? नादुरुस्त बसेसमुळे एखाद्या वेळी मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी द्यायला हवे.
बाहेरून येणाऱ्या गरिबांना आणि छोट्या व्यावसायिकांना लुटण्याचा परवानाच जणू ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. स्थानिक पातळीवर होणारी ही आर्थिक लूट म्हणजे भाविकांच्या खिशावर टाकलेला दरोडाच आहे.
मांढरदेव देवस्थानच्या नावाने जो कोट्यवधींचा निधी येतो, तो जातो कुठे? प्रशासनाच्या डोळ्यावर पुतळी चढली आहे का? आई काळूबाईच्या भक्तांचा अंत पाहणे आता प्रशासनाने थांबवावे, अन्यथा भविष्यात या अन्यायाविरुद्ध जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही अशी, चर्चा भाविकांमध्ये जोर धरू लागली आहे.