
दिवा: मध्य रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी अमोल केंद्रे यांनी १ जुलै २०२५ पासून दिवा रेल्वे स्थानकाबाहेर बेमुदत धरणे सुरू केले. दिवा येथून सीएसएमटी लोकल सेवा त्वरित सुरू करावी, दिवा येथे सर्व जलद लोकल गाड्या थांबवाव्यात आणि दिवा-पनवेल लोकल सेवा सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह हे धरणे सुरू करण्यात आले.
या संदर्भात त्यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की दिवा हे महत्त्वाचे जंक्शन असूनही येथे जलद लोकल गाड्या थांबत नाहीत आणि दिवा येथून कोणतीही लोकल ट्रेन सुटत नाही, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. २०१४ पासून रेल्वे अपघातात शेकडो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि दररोज किमान एक अपघात होत आहे, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. लोकल भाडे वाढवून दिवा येथून सीएसएमटी लोकल गाड्या सुरू करण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
लोकल भाडे वाढवून दिवा येथून सीएसएमटी लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप अश्विनी केंद्रे यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल धनराज केंद्रे यांनी या मागण्यांबाबत यापूर्वीच अनेक निवेदने दिली आहेत, स्वाक्षरी मोहिमा राबवल्या आहेत, मोर्चे काढले आहेत, सात दिवसांचे उपोषण केले आहे आणि ढोल बजवून आंदोलनही केले आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. ९ जूनसारखे दुर्दैवी अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी लोकल गाड्यांचे भाडे वाढवून दिवा येथून सीएसएमटी लोकल ट्रेन तात्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्याविहार, घाटकोपर, डोंबिवली येथून लोकल सेवा सुरू करता येत असतील तर दिवा जंक्शन असूनही येथून लोकल ट्रेन का सुरू होत नाही, असा प्रश्न अश्विनी केंद्रे यांनी उपस्थित केला आहे. अपघातात जीव गमावलेल्यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. हे आंदोलन पूर्णपणे लोकशाही आणि शांततापूर्ण पद्धतीने सुरू करण्यात आले असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुका आल्यावर सर्व पक्ष आश्वासने देतात. जिंकल्यानंतर ते विसरतात. अशा नेत्यांना मानवी जीवाची किंमत नाही का? दररोज कोणत्या ना कोणत्या कुटुंबातील बहीण किंवा मुलगी मृत्युमुखी पडत आहे. तरीही रेल्वे प्रशासन गप्प आहे किंवा त्याकडे दुर्लक्ष करत आहे.