
समीर वानखेड़े महाराष्ट्र : महाराष्ट्रातील लातूरमधून भीषण अपघाताची घटना झाली आहे. एका भीषण कार अपघातात चार मित्रांचा जागीचा मृत्यू झाला. देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार हे तरुण तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. चौघांच्याही मृत्यूने कुटुंबियासह मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.
लातूर नांदेड महामार्गावरच्या महाळुग्रा पाटी इथे कार आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा भीषण अपघात झालाय. नांदेड वरून तुळजापूर येथे भवानी मातेच्या दर्शनासाठी जात असेलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय. दरम्यान या अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. तर मृत्युमुखी पडलेले चार ही तरुण नांदेड येथील रहिवासी आहेत.
मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके आणि नर्मन कात्रे अशी मृतांची नावे आहेत. या चौघांसह आणखी दोनजण नांदेडहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास लातूर नांदेड महामार्गावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा चालक नर्मन कात्रे याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा पुढच्या बाजूने चेंदामेंदा झाला.