वऱ्हाणे शिवारात भेसळयुक्त पावणेचार कोटींची सुपारी जप्त! दिल्ली येथे नेत असताना अन्न व औषध प्रशासनाचा छापा
भेसळ व रंग लावलेली सुपारी मिळून आल्याने खळबळ उडाली असून ही सुपारी नेमकी कशासाठी वापरली जाते हा संशोधनाचा भाग आहे.

मालेगाव, प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : मनमाड-मालेगाव रस्त्यावरील वऱ्हाणे शिवारातील हॉटेल हरयाणा मेवात ढाब्यामागे छापा टाकून अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाने रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे पाऊणेचार कोटीचा साठा जप्त केला आहे.
अकरा ट्रकमधून छुप्या पद्धतीने दिल्ली येथे या सुपारीची वाहतूक करण्यात येत होती. भेसळ व रंग लावलेली सुपारी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही सुपारी नेमकी कशासाठी वापरली जाते हा संशोधनाचा भाग आहे.
मनमाड – मालेगाव रस्त्यावरून कर्नाटक राज्यातून दिल्ली येथे रंग लावलेल्या सुपारीची ट्रकमधून अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती.
या माहितीच्या अनुषंगाने गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे व सहकाऱ्यांनी वऱ्हाणे शिवारातील हॉटेल हरयाणा मेवात ढाबा व परिसरात शोध घेतला. त्यांना ढाब्याच्या पाठीमागे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक करणारे तब्बल ११ ट्रक छुप्या पद्धतीने लावलेले आढळून आले.
पथकाने सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कीटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व ते लपविण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे २५२ टन साठा मिळून आला. यानंतर नाशिक कार्यालयाच्या पथकास पाचारण करण्यात आले.
पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुपारीचे एकूण ११ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित २५२ टन सुमारे ३ कोटी ८४ लाख १९ हजार ९८३ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. श्री. दाभाडे तपास करीत आहेत.
अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (दक्षता) राहुल खाडे, नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील यांच्यासह श्री. दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, योगेश देशमुख, गोपाळ कासार, अमित रासकर, सुवर्णा महाजन, सायली पटवर्धन, नमुना सहाय्यक सचिन झुरडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी व कारवाई सुरु होती.