
लातूर प्रतिनिधी: लातूर ते टेंभुर्णी या महामार्गाची दुरावस्था पाहून आपल्यालाही शरम वाटते. यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र आता लवकरच हा रस्ता चारपदरी महामार्गात रूपांतरित केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील महामार्गाच्या प्रलंबित कामांसाठी २२० कोटी रूपये अधिकचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १७४ कोटी रूपयांच्या विकासकामांचे आज भूमिपूजन होत असल्याची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
धाराशिव शहरातील सिध्दाई मंगल कार्यालय येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने १७४ कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.