
सातारा जिल्हा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ
हिमालय फौंडेशनतर्फे लोणंद येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकारांचा सन्मान
पत्रकारांचा गौरव व दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांनी ६ जानेवारी रोजी दर्पण हे वृत्तपत्र चालू केले त्यामुळे हा दिवस पत्रकार दिन म्हणुन साजरा होतो.पत्रकार दिनाचे औचित्य साधून हिमालय फौंडेशनच्या वतीने हॉटेल आस्वाद येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लोणंद शहर व परिसरातील सर्व पत्रकारांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारांचे स्वागत करण्यात आले. समाजातील विविध प्रश्न, समस्या आणि जनतेच्या भावना शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करत असतात. सत्य, निर्भीड व जबाबदार पत्रकारिता ही समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी हिमालय फौंडेशनच्या नव्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. या दिनदर्शिकेमधून सामाजिक संदेश, जनजागृतीपर माहिती तसेच फौंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा देण्यात आला आहे. पत्रकारांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून पत्रकारांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास हिमालय फौंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद मुल्ला, उपाध्यक्ष डॉ. प्रज्ञेश गोरड, सचिव जाविद पटेल,जयंत कुलकर्णी, दिपेंद्र कोकरे, सत्यजित शानभाग, आयुब सय्यद, रणजित शेळके पाटील, अॅड सुरेश शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष मोहम्मद मुल्ला यांनी आपल्या भाषणात पत्रकार समाजाचे आरसे असून समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे प्रतिबिंब पत्रकारितेतून उमटते. त्यामुळे पत्रकारांचे कार्य अतिशय जबाबदारीचे आहे, असे नमूद केले.उपाध्यक्ष डॉ. प्रज्ञेश गोरड यांनी पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत अशाच प्रकारे पत्रकार दिन साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. सचिव जाविद पटेल यांनी हिमालय फौंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
पत्रकार शशिकांत जाधव, रमेश धायगुडे,ज्ञानेश्वर ससाणे, गणेश भंडलकर, अक्षय दोशी,दिलीप वाघमारे, मोहन बोरकर, विजय शेळके, आबा धायगुडे, पांडूरंग कुंभार, वैष्णव ढमाळ हे पत्रकार उपस्तिथ होते हिमालय फौंडेशनने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान करून समाजातील महत्त्वाच्या घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिमालय फौंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांनी हिमालय फौंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.