
प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर, मालेगाव: मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत तालुक्यातील चिखलओहोळ शाळेने नाशिक विभागात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गटात प्रथम क्रमांक पटकावला. याचे पारितोषिक वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव येथे झाले. यावेळी चिखलओहोळ शाळेला तीन लाखाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणांच्या आधारे जिल्ह्यातील शाळांचे परीक्षण करण्यात आले. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाचे स्वरूप, विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील समावेश असे होते. त्यामध्ये शाळेची केंद्रस्तर, तालुकास्तरावर व जिल्हास्तर अशा तीन पातळीवर शंभर गुणांची विविध पथकाकडून तपासणी केली गेली.
चिखलओहोळ जि प शाळेला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी शाळेचे मुख्याध्यापिक किरण कुलकर्णी, शिक्षक किशोर किशोर जुन्नरे, सीमा पाटील, संध्या सावंत, माया ठाकरे, संगीता खैरनार , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय अहिरराव, सरपंच शिवाजी बोरसे, विद्यार्थी व पालक व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. या शाळेला गावकऱ्यांचे खूप सहकार्य लाभले आहे.
तपासणी मध्ये विद्यार्थ्यां मार्फत वर्ग सजावट, शालेय परिसर, शालेय इमारत व परिसरातील स्वच्छता, वृक्षारोपण व संवर्धन परसबाग, विद्यार्थी मंत्रिमंडळ, शालेय विद्यार्थी बचत बँक, भौतिक सुविधा, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेसाठी राबविलेले विविध उपक्रम, आर्थिक साक्षरता, व्यवसाय मार्गदर्शन व कौशल्य विकास, लहान वयातील वाढते आजार व प्रतिबंधात्मक उपाय, यासाठी राबवलेले उपक्रम. माजी विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती शालेय सहभाग, लोकसहभाग, तंबाखु मुक्त, प्लास्टिक मुक्त शाळा यासाठी राबवलेले उपक्रम. स्थानिक सेवाभावी संस्थेचा शाळा विकासासाठी सहभाग, स्वच्छता मॉनिटर उपक्रम, नवभारत साक्षरता अभियान आदी बाबी विचारात घेण्यात आल्या.
मालेगाव तालुक्यातील जी. प. चिखलओहोळ ही शाळा तालुक्यातून प्रथम आली. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, माजी केंद्र प्रमुख रत्नाकर सूर्यवंशी, तसेच पर्यवेक्षकिय यंत्रणेचे हे यश असून आनंदाची आणि कौतुकास्पद बाब आहे. या शाळेची प्रेरणा घेऊन इतर शाळांनी देखीप यापुढे वेगवेगळ्या पातळीवर नावलौकिक करावे.