
सातारा जिल्हा प्रतिनिधी वैष्णव ढमाळ
पराज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या दहा पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांची अधिसूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
देश-विदेश धार्मिक सांस्कृतिक मनोरंजन शिक्षण सरकारी योजना
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; ५ फेब्रुवारीला मतदान
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; ५ फेब्रुवारीला मतदान
राज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या दहा पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांची अधिसूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी गणेश पवार, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर तसेच विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. मात्र १८ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ जानेवारी रोजी होणार असून २३, २४ व २७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० नंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.
लातूर जिल्ह्यात एकूण ५९ जिल्हा परिषद गट व ११८ पंचायत समिती गण आहेत. अंतिम मतदार यादीप्रमाणे जिल्ह्यात एकूण १४ लाख ९९ हजार १९० मतदार असून त्यामध्ये ७ लाख ८६ हजार ६८३ पुरुष व ७ लाख १२ हजार ४९४ महिला मतदारांचा समावेश आहे
निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १ हजार ७५३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये १३ महिला संचलित, ११ युवा संचलित व ६ दिव्यांग संचलित मतदान केंद्रांचा समावेश असेल. सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, शेड तसेच स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण १० हजार ५१८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद उमेदवारांसाठी ६ लाख रुपये तर पंचायत समिती उमेदवारांसाठी ४.५ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारी पथके व स्थिर संनियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत. सर्व मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
