Lok Sabha Chunav 2024

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन


समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र:
प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवाय मतदानातूनच आपण आपले व देशाचे उज्वल भविष्य निश्चित करू शकतो. त्यामुळे मतदारांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सामील व्हा, असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मतदारांच्या नावे संदेशपत्र लिहून जिल्हाधिका-यांनी नागरिकांना मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. पुढे ते म्हणतात, भारत हा उत्सवप्रिय देश आहे. प्रत्येक उत्सव आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो. यावर्षी सुद्धा लोकशाहीचा उत्सव देशभरात साजरा होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो. या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे.

भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. या मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबध्द आहे.

त्यामुळे येत्या 19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी होणा-या निवडणुकीत सहभागी व्हा. विशेष म्हणजे कोणाच्याही दबावात न येता निर्भिडपणे मतदान करा. लक्षात ठेवा मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सर्व कामे बाजुला ठेवून कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी पत्रातून केले आहे.

Related Articles

०००००००

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!