
प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर,मालेगाव : येथील महापालिका हद्दीतील दरेगाव भागातील जलवाहिनी चार दिवसांपूर्वी फुटली होती. महापालिकेकडून दुरुस्तीचे काम संथगतीने सुरु आहे. दुरुस्तीमुळे नागरिकांना फटका बसला आहे. या भागात पाच दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. परिसरातील १६ ठिकाणाच्या नळाला पाच दिवसानंतरही पाणी न आल्याने महिलांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागली. अनेकांना पाण्याचा शोध घेण्यासाठी दूर अंतरावर जावे लागले.
मालेगाव येथील दरेगाव पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. वाया गेलेल्या पाण्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. उशिरा का होईना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. शहा प्लॉट, शफी पार्क,भागातील हाफिया मुन्नी मशीद, सय्यद पार्क, इनामदरा, कोकनदरा, केडी पार्क यासह सोळा ठिकाणचा पाणीपुरवठा खंडीत झाला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम संथ गतीने करण्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत या भागातील पाणी पुरवठा पुर्ववत झालेला नव्हता. या भागात बुधवारी (ता. २०) नळांना पाणी आले होते. यानंतर पाणी आले नाही. भर उन्हात पाण्यासाठी म हिलांची दमछाक होत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण करुन पाणीपुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून केली जात आहे.