महाराष्ट्र. कल्याण ते लातूर महामार्ग, लातूरकरांना खुशखबर….
एमएसआरडीसी राज्यात 15 नवीन महामार्ग तयार करणार ! MSRDC चा प्लॅन काय आहे?

लातूर प्रतिनिधी. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 5267 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार केले जाणार आहेत.यापैकी 1050 किलोमीटर लांबीचे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकसित होणार आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात 4217 किलोमीटर लांबीचे महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळ तयार करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 4217 किलोमीटर लांबीचे एकूण 15 महामार्ग तयार होणार आहेत.
त्यामध्ये 94 किलोमीटर लांबीचा मुंबई ते पुणे महामार्ग बांधून तयार झाला आहे. विशेष म्हणजे 701 km लांबीचा मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग देखील अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचे सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू आहे.नागपूर ते भरवीर हे 600 km चे काम पूर्ण झाले असून भरवीर ते आमने पर्यंतचे 101 km लांबीचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल आणि यावर देखील वाहतूक सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे.
समृद्धी महामार्गाच्या बाकी राहिलेल्या भरवीर ते आमने या टप्प्यातील भरवीर ते इगतपुरी या 25 किलोमीटरच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आणखी 13 महामार्ग तयार होणार आहेत.विशेष म्हणजे या 13 महामार्गांमध्ये नागपूर ते गोवा 802 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाचा समावेश राहणार आहे. तसेच कल्याण ते लातूर असा एक नवीन द्रुतगती महामार्ग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग कसा राहणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कल्याण ते लातूर महामार्ग तयार करण्याची गरज काय
सध्या कल्याणहुन मराठवाड्यातील लातूर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना दहा तासांचा कालावधी खर्च करावा लागतो. यामुळे हा प्रवासाचा कालावधी कमी व्हावा यासाठी कल्याण ते लातूर दरम्यान नवीन महामार्ग तयार होणार आहे.
याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे. या महामार्गासाठी 50,000 कोटी रुपयांचा खर्च लागेल असा एक अंदाज असून यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास फक्त आणि फक्त चार तासात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
कसा असणार रूट
मीडिया रिपोर्टनुसार, कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग कल्याण येथून सुरू होऊन माळशेज घाटातून पुढे अहमदनगरला जाईल. तेथून पुढे बीड, मांजरसूंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत संपेल. हा द्रुतगती महामार्ग माळशेज घाटातून जाणार आहे. यासाठी घाटात आठ किमीचा बोगदा बांधण्यात येणार अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान या महामार्गाचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार केला जात असून हा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. जेव्हा या प्रस्तावाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळेल तेव्हा या महामार्गाचे अलाइनमेंट आणि आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले जाईल.