
उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून अवघ्या एका तासात सदर मुलाला आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उस्माननगर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सदर मुलांच्या आईवडीलांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.
उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कंधार तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगा रात्रीपासून बेपत्ता असल्याची फिर्याद सदरील १५ वर्ष वयाच्या मुलांच्या वडिलांनी उस्माननगर पोलिसांकडे दिली. उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी या संवेदनशील प्रकरणांची गंभीर दखल घेत मिशन निर्भया अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. सदर मुलांच्या वडिलांकडे मुलाजवळ काय आहे किंवा नाही याबाबत सविस्तर चौकशी केली. त्यावेळी सदर १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलांकडे मोबाईल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी तातडीने सदरील मुलाजवळ असलेल्या मोबाईलचा नंबर तात्काळ सायबर सेल विभागाकडे देऊन मोबाईलचे लोकेशन देण्याची मागणी केली. सायबर सेलचे पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने पडताळणी करत सदर मोबाईलचे लोकेशन चिखलवाडी नांदेड येथे असल्याचे उस्माननगर पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी तातडीने पोलिस कर्मचारी प्रकाश पेदेवाड व मधुकर पवार यांना मुलांचा शोध घेण्यासाठी नांदेड येथे पाठविले.ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी नांदेड चिखलवाडी गाठत त्या मुलांचा शोध घेतला असता तो चिखलवाडी भागात सापडला पोलिस कर्मचारी मधुकर पवार व पेदेवाड यांनी मुलाला ताब्यात घेऊन मुलगा सुखरुप असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांना कळविले. व तातडीने मुलांना घेऊन उस्माननगर पोलिस ठाणे गाठले. अवघ्या एका तासात बेपत्ता अल्पवयीन मुलांचा शोध लावून सदर मुलाला आई वडीलांच्या ताब्यात दिले आहे. उस्माननगर पोलिसांनी अवघ्या एका तासात बेपत्ता मुलांचा शोध लावल्यामुळे सदर मुलांच्या आईवडीलांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.