
समीर वानखेड़े महाराष्ट्र:
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसद इथं सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भोवळ येऊन ते स्टेजवरच कोसळले. कार्यकर्त्यांनी त्यांना सावरत मंचावरून उचलून नेलं आणि ताबडतोब त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. काही वेळाने नितीन गडकरी यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.
आपल्या भााषणात गडकरी यांनी देशात विकासाचे पर्व सुरू असून या पर्वात तुमच्या प्रत्येकाचं मत महत्वाचं असल्याचं सांगितलं. तसंच महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना भरभरुन मतदान करण्याचं आवाहनही गडकरी यांनी केलं. पीएम मोदी यांच्या काळातील रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या कामाचा आढावाही त्यांनी या सभेत घेतला. विरोधकांकडे प्रचासासाठी मुद्देच नसल्याचा टोलाही यावेळी गडकरी यांनी लगावला.
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे. या मतदारासंघात बुधवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे सर्व पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यवतमाळच्या पुसद इथल्या या सभेसाठी मोठी गर्दी जमली होती. सभेत नितीन गडकरी भाषण करण्यासाठी आले. भाषण करत असताना अचानक त्याना भोवळ आली. यामुळे एकच तारांबळ उडाली. गडकरी यांच्या अंगररक्षकांनी त्यांना सावरलं आणि ताताडीने प्रथमोपचार देण्यात आले.
विदर्भात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअस इतका आहे. उष्णतेमुळे नितीन गडकरी यांना भोवळ आल्याची प्राथमिक माहिती आहे.
याआधीही गडकरींना आली होती भोवळ
याआधीही नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. अहमदनगरमधल्या एका कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली होती. कार्यक्रमादरम्यान थोडं सफोकेशन झाल्याने आपल्याला चक्कर आल्याचं त्यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. पश्चिम बंगाल मधील सिलिगुडीतील दागापूर इथं एका जाहीर कार्यक्रमातही गडकरींची तब्येत बिघडली होती. भाषण सुरू असताना अचानक त्यांना भोवळ आली. यानंतर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक कार्यक्रमस्थळी पोहलं आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
2019 साली शिर्डीमधील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरच असताना ते कोसळले होते. तर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमातही राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली होती.