
मालेगाव प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : जुने व नवे बस स्थानकात भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला असून बस मध्ये चढताना चोरटे गर्दीचा फायदा घेऊन महागडे मोबाईल, सोनसाखळी, पैसे असा किमती ऐवज चोरी करून पोबारा करत आहेत. जुने बस स्थानक शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असूनही चोर बिनधास्तपणे हात सफाई करतअसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी, सोनसाखळी, धूम स्टाईलने मोबाईल लांबविणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. नवे व जुने बस स्थानकांमध्ये चोरट्यांनी तर आपले बस्तानच बसविले आहे. जुने बस स्थानक हे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर आहे. सायंकाळी चाकरमाने घरी जात असताना येथील जुने बस स्थानकात बसमध्ये होणारा प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरटे आपले ईप्सित साध्य करत आहेत
गेल्या काही दिवसात याच परिसरातून मोबाईल, पर्स, सोनसाखळी, पैसे, दुचाकी अशा महत्त्वाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. जुने बस स्थानकात असलेली सीसीटीव्ही यंत्रणा तर नावालाच आहे. त्याकडे आगाराचे दुर्लक्ष आहे. त्याचाही फायदा चोरटे उठवत आहेत. प्रवासी ग्राहकांचे किमती ऐवज चोरीला जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांची यंत्रणा या चोऱ्यांना पायबंद घालण्यात अपयशी ठरत असून याबाबत धडक कारवाई करण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.