पवाळे रस्त्याची १५ वर्षांपासून दुरवस्था
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे. तालूका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २९/१०/२०२६.
मुरबाड, ता. २९(बातमीदार) : मुरबाड-शहापूर मार्गावरील कुडवली ते पवाळे फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
१५ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मुरबाड औद्योगिक वसाहतीतून कुडवली अतिरिक्त औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या या मार्गावरून दररोज प्रवास करणारे उद्योजक, कामगार आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून पुनर्बांधणी करावी, अशी मागणी होत आहे. मुरबाड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना कुडवली अतिरिक्त औद्योगिक वसाहतीशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे.
या परिसरातील शेकडो कारखानदारांसह पोवाळे आणि शहापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही रस्त्याच्या खराब अवस्थेचा फटका बसत आहे. खड्डे आणि उखडलेल्या रस्त्यामुळे वाहन चालविणे कठीण झाले असून, प्रवासादरम्यान अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे.
या मार्गावरील कुडवली ते पवाळे फाट्यादरम्यान जुन्या मोरीलगत अवघड वळण आहे. या ठिकाणी वारंवार वाहनांचे अपघात होत असल्याने नवीन पूल बांधण्याची मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे.
मुरबाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रकांत घाडगे यांनी सरकारने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. शहापूर-मुरबाडमार्गे जेएनपीटीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग आहे.
शहापूर ते मुरबाडदरम्यान महामार्गाचे काम करताना फाट्यापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला; मात्र फाट्यापासून मुरबाड शहरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम झालेले नाही. तसेच अस्तित्वातील डांबरी रस्त्याचीही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे
