महाराष्ट्रः बारावी परीक्षेसाठी शिक्षण यंत्रणा सज्ज
लातूर विभागातून ९६ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

लातूर प्रतिनिधीः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारी, बुधवारपासून सुरुवात होणार असून, लातूर विभागीय मंडळातील ९६ हजार १७९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. यासाठी २३८ केंद्रांची निवड करण्यात आली असून, बुधवारी पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
बोर्डाकडून ४६ परिरक्षकांची नियुक्ती…
लातूर विभागीय मंडळाकडून लातूरसाठी १७, नांदेड १९ आणि धाराशिवसाठी १० परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी यापुर्वीच संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. दरम्यान, बारावीच्या परीक्षा बुधवारपासून सुरु होत असून, केंद्रप्रमुख, परिरक्षक आणि भरारी पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होणार असून, लातूर विभागीय मंडळाने सर्व तयारी पुर्ण केली असल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.