
जेठमल मुथा जिल्ला प्रमुख वंदेभारत लाईव्ह टीव्ही न्यु पुणे
महाळुंगे एमआयडीसीतील कंपनीतून इंम्पोर्टेड रबरी पार्टची चोरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपीकडून ६ लाख ७५ हजारांच्या मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना, पोलीस हवालदार काळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून खबर मिळाली की, एक टाटा पिकअप गाडी (नं एम.एच-१४ जे.एल. ५०८४) चोरीचा माल घेवुन चिखली येथे विक्रीसाठी येणार आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. खंडणी विरोधी पथकाच्या या टीमने शफिक यासीन पठाण (वय ४९, रा. निमगाव खंडोबा, ता. खेड जि.पुणे) याला १ लाख ७५ हजार रुपये किंमतीची दुचाकी व चारचाकी वाहनांचे रबरी पार्ट व गुन्ह्यात वापरलेली टाटा पिकअप टेम्पो असा एकुण ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याचेकडे अधिकचा तपास केला असता त्याने तो माल सनी भिवरकर याच्यासह जयश्री पॉलीमर कंपनी, महाळुंगे एमआयडीसी, पुणे येथून चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला मुद्देमालासह महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भदाणे, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, शैलेश मगर, प्रदीप गायकवाड, भारत गाडे यांचे पथकाने केली आहे.