
नाशिक प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : सातपूरच्या श्रमिक नगर मधील सात माऊली चौकात रस्त्यावर पार्क केलेल्या चार चाकी आणि दुचाकी तोडफोड करणाऱ्या समाजकंटक युवकांना सातपूर पोलिसांनी जेलबंद करून त्यांची काल परिसरातून धिंड काढण्यात आली. यावेळी वाहने फोडलेल्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी नागरिकांसमोर चोप दिला. या समाजकंटकांची दहशत कमी करण्याच्या हेतूने पोलिसांनी त्यांना चोप दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
श्रमिक नगर येथील सात माऊली चौक परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या चार चाकी व दुचाकी वाहनांवर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली होती. चार चाकी व दुचाकी वाहनांवर अज्ञात ८/१० टवाळखोरांनी दगडफेक करून गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केले होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या सागर भगवान हुलनोर वय (२१), सधीर भारत भालेराव वय (२७), ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार वय (२७) दिपक राजेंद्र अहिरे वय (२७), मिलींद पिराजी मुंढे वय (२०) सर्व आरोपी रा. श्रमिक नगर यांना रविवारी अटक केली.
सोमवारी सायंकाळी तोडफोड केलेल्या परिसरात नागरिकांना आरोपींची दहशत कमी करण्यासाठी या संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्यासह हवालदार अनिल आहेर, संभाजी जाधव, अनंता महाले, रोहिदास कनोजे, यांनी कामगिरी बजावली.