
प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : नाशिक/देवळा : येथील देवळा- खर्डी रस्त्यावरील शिंदेवाडीतील एका बंद घराला आज मंगळवारी दिनांक 13 रोजी दुपारी एक वाजता विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील रोख रक्कम ३ लाख 60 हजार रुपयांसह घरातील संसार उपयोगी असे एकूण 14 लाख 15 हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. देवळा नगरपंचायतीचे अग्निशामक बंब वेळेत पोहोचल्याने कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली व पुढील अनर्थ टळला.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी दिनांक 13 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास देवळा येथील शिंदेवाडीत राहणारे विनोद बाजीराव शिंदे यांच्या बंद घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागली. घरातून धूर येत असल्याने आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच घटनास्थळी स्थानिक व इतरांनी धाव घेतली. वीज वितरण कंपनीला याची कल्पना दिल्यावर येथील तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलीच स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी देवळा नगरपंचायतीचे अग्निशमन बंब वेळेत पोहोचल्याने आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ टळला. घरात आगिने रौद्ररूप धारण केल्याने घरातील रोख रकमेसह मौल्यवान वस्तू यात जळून खाक झाल्याने शिंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत रोख रक्कम 3 लाख 60 हजार रुपये, सोने 1 लाख 80 हजार, संसार उपयोगी वस्तू 5 लाख, टीव्ही 45000, फर्निचर 1 लाख 50 हजार, सिलिंग व पियूईसी 40 हजार, लोखंडी कपाट 60000, फ्रिज फॅन आदी 50 हजार, पलंग 30000, असे एकूण 14 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा देवळ्याचे तलाठी उमेश गोपनारायण यांनी पंचनामा केला आहे.
या घटनेमुळे देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. या कामी उपनगराध्यक्ष मनोज आहेर जितेंद्र आहेर, लक्ष्मीकांत आहेर, गटनेते संजय आहेर, किशोर आहेर, प्रदीप आहेर, पंकज आहेर, राजेंद्र आहेर आदींसह नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.