
प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर,मालेगाव :तालुक्यातील सातमाने परिसरात मोटारसायकल वरून गुटखा वाटप करणाऱ्या एकास विशेष पोलीस पथकाने जेरबंद केले. या कारवाईत दुचाकी व गुटखा असा ६३ हजार रूपये किंमतीचा विविध प्रकारचा पानमसाला व गुटखा व विविध प्रकारचा पानमसाला साठा जप्त करण्यात आला आहे.
सातमाने परिसरात इंदिरा नगर अजंग येथील उत्तम दगा भदाणे (६३) हा दुचाकीवरून पानटपरी व किराणा दुकानदार यांना गुटखा वाटप करीत असल्याची माहिती विशेष पोलीस पथकास मिळाली त्यांनी सातमाने फाटा परिसरात त्याच्यावर पाळत ठेवली होती. याच दरम्यान तो तेथून जात असतांना पोलिसांनी त्याला थांबवीत त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ तेरा हजार रूपये किंमतीचा विविध प्रकारचा पानमसाला व गुटखा साठा मिळून आला. या संदर्भात विशेष पोलीस पथकाचे पोलीस नाईक रामराव शेरे यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी उत्तम भदाणे विरूद्ध गुन्हा करून त्याला अटक केली आहे. वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे पोऊनि नवले हे तपास करीत आहेत.