
सुमिता शर्मा महाराष्ट्र:
इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, दाखले काढून ठेवावेत, अशा स्पष्ट सूचना तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. प्रवेशप्रक्रियेत बनावट शैक्षणिक दाखले देणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर गुणांच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते.
दहावी आणि बारावीच्या नंतरच्या पदविका प्रवेशांसाठी जात/जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र, प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवाराने प्रवेश मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत जात, जमात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित जात, जमात पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.