
प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर, नाशिक : अवैध मद्यापाठोपाठ प्रतिबंधित गुटख्याविरोधात शहर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. जुन्या नाशिकमधील बुधवार पेठेतून पावणेदोन लाखांचा तर म्हसरूळ हद्दीतून सुमारे ३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आयुक्तालय हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू केली आहे. अवैधरीत्या सुरू असलेले जुगार अड्डे, देशी दारूचे अड्डे यावर धडक कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी आपला मोर्चा प्रतिबंधित गुटख्याकडे वळविला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे अंमलदार रमेश कोळी, जोगेश्वर बोरसे यांना जुने नाशिकमधील बुधवार पेठेत अवैधरीत्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा करण्यात आल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवार पेठेतील संशयित विजय मधुकर शिंदे (४३, रा. अनुसया अपार्टमेंट, बुधवार पेठ, जुने नाशिक) हा चोरीछुप्या प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्री करीत असताना आढळून आला. त्यास ताब्यात घेत त्याच्या खोलीची झडती घेतली असता, पोलिसांच्या हाती १ लाख ७१ हजार ३३८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संशयित शिंदे याची पोलिसांनी चौकशी केली असता, सदरचा प्रतिबंधित गुटखा संशयिताने मखमलाबाद परिसरातील संशयित वैभव उर्फ अशोक मोराडे (रा. प्रभातनगर, म्हसरुळ, दिंडोरी रोड, मखमलाबाद) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संशयित मोराडे याच्या मखमलाबादमधील घराची झडती घेतली असता, त्या ठिकाणी पोलिसांच्या हाती २ लाख ९९ हजार ६५० रुपयांचा साठा जप्त केला. अशारीतीने पोलिसांनी ४ लाख ७० हजार ९८८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक गजानन इंगळे. रमेश कोळी देविदास ठाकरे, महेश साळुंके, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, मुक्तार शेख, किरण शिरसाठ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.