महाराष्ट्र. पोलीस अधिकाऱ्याला लाज घेताना रंगेहात पकडले
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चाळीस हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, लाचखोर अधिकाऱ्यावर याआधीही कारवाई

विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 40 हजारांची लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.तक्रारदार यांचे चुलत भाऊ यांचा दि. 22 ऑगस्ट 2021 रोजी अपघाती मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या हयातीत एच.डी.एफ. सी. कारगो या इन्शुरन्स कंपनीकडून दोन कोटी रूपयांचा विमा काढला होता. मात्र, त्यांचे मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने सदर पॉलिसीची रक्कम वारसांच्या नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे जमा करून फसवणूक केली. याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यांच्याकडे होता.
50 हजारांची मागितली लाच
तक्रारदार यांची वहिणी यांनी तपासकामी न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावरून न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्याकरीता सहा. पोउनि आरिफ अली सैय्यद याने 50 हजारांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार यांनी दि. 27 फेब्रुवारी रोजी धुळे एसीबीकडे धाव घेतली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. आरिफ अली सैय्यद याचेशी तडजोड करून 40 हजार रूपये देण्याचे तक्रादाराने ठरवले व लाचेची रक्कम घेण्यासाठी गिंदोडिया चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजुस असलेल्या भाग्यश्री पान कॉर्नर समोर बोलविले.40 हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ
सहाय्यक पोउनि आरिफ अली सैय्यद यास लाचेची ४० हजारांची रक्कम स्वीकरताना धुळे एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. दरम्यान कारवाई करताना एसीबीच्या एका कर्मचाऱ्याला झालेल्या झटापटीत पायाला किरकोळ जखम देखील झाली आहे. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
लाचखोर अधिकाऱ्यावर याआधीही कारवाई
दरम्यान, सहायक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद याने यापूर्वी देखील लाच घेतली होती. दि. 22 जुलै 2010 रोजी 70 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी त्याच्याविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने 2013 मध्ये पाच वर्षे शिक्षा दिल्याने पोलीस खात्यातून त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सन 2019 मध्ये सैय्यद यास दिलासा दिल्याने ते पुन्हा पोलीस खात्यात पुन्हा रुजू झाले होते.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोनि मंजितसिंग चव्हाण, पथकातील पोनि हेमंत बेंडाळे, पोनि रूपाली खांडवी, राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या पथकाने केली.