
नाशिक/त्र्यंबकेश्वर, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर : एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांना महिलांनी घेराव घालत तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत जाब विचारला व निषेध केला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्यसेवा सध्या वाऱ्यावर असून, उपकेंद्रात व काही प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयात हजर नसतात. दररोज बाह्य रुग्ण तपासणी होत नाही.
पर्यायाने रुग्णांना त्र्यंबकेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. याच्या विरोधात एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांना घेराव घालण्यात आला. ज्या ठिकाणी उपकेंद्र आहे अशा ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करून रोज ओपीडी घेणे बंधनकारक असताना एकाही ठिकाणी ओपीडी घेतली जात नाही, असा जाब विचारत निवेदन देण्यात आले.